नवी मुंबई, वृत्तसंस्था | नेरूळ भागातील सीवूड्स परिसरात किड्यांनी उच्छाद मांडला असून या किड्यांमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. नवी मुंबई महानगर पालिकेकडे जाणाऱ्या रोडवर या किड्यांचा गेले दोन दिवस सुळसुळाट झाला आहे.
परिसरातील रोड, सोसायटीच्या भिंती आणि झाडांवर हजारो किडे आहेत. हे किडे अंगावर पडल्याने नागरिकांच्या शरीराला खाज सुटत असल्याच्या तक्रारी येत आहेत.नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उन पडत असून संध्याकाळच्या सुमारास वीजा आणि गडगटासह पाऊसही पडत आहे. या बदललेल्या वातावरणामुळे सिवूड परिसरात किड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
परिसरातील काही सोसायट्यांच्या संरक्षण भिंतीवरही हे किडे मोठ्या प्रमाणावर बसले आहेत. तसेच परिसरातील अनेक झाडांवरही या किड्यांनी बस्तान बसवले आहे. या रस्त्यांवरून जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या अंगावर हे किडे पडत आहेत. अशात दुचाकी स्वारांच्याही अंगावर हे किडे पडत असून यामुळे अपघाताची होण्याची शक्यताही परिसरातील लोकानी व्यक्त केली आहे. परिसरातील लोकांनी, तसेच लोकप्रतिनिधींनी महानगर पालिकेकडे याबाबत तक्रारही केली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी केली आहे.