
सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर तालुक्यातील मिल्लत नगर परिसरात एका दुर्दैवी घटनेत भुसावळ येथील २९ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मोहम्मद इस्माईल मोहम्मद आलम उर्फ शोलु असे या मृत तरुणाचे नाव असून, तो कामानिमित्त फैजपूर येथे आला असताना ही दुर्घटना घडली.

२९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या मोहम्मद इस्माईल कामासाठी फैजपूरच्या मिल्लत नगर परिसरात आला होता. तो चुकून रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरीत पडला. विहिरीत पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आला. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रशीद तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर परिसरातील उघड्या आणि असुरक्षित विहिरींवर तातडीने संरक्षक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणीही होत आहे.



