दुदैवी घटना : दुचाकीच्या चाकात साडी अडकल्याने अपघातात महिलेचा मृत्यू

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । । छत्रपती संभाजीनगरहून पहूरकडे येत असताना दुचाकीच्या मागील चाकात साडी अडकल्याने झालेल्या अपघातात पहूर येथील ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. हा दुर्दैवी घटना गुरूवारी ३० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास सिल्लोड फाटा, भवन गावाजवळ घडला.

मृत महिला मनीषा कैलास चौधरी (वय ४८, रा. पहूर, ता. जामनेर) या आपल्या मुलगा ऋषीकेश चौधरी याच्यासोबत दुचाकीने (एम.एच. १९ इ.सी. ३९७९) छत्रपती संभाजीनगरहून पहूरकडे येत होत्या. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफ वर निल्लोड फाटा, भवन गावाजवळ त्यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकल्याने त्या जोरात खाली पडल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर मार लागला. तातडीने त्यांना सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना सपकाळ यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे शवविच्छेदन सिल्लोड येथे करण्यात येणार आहे.

मनीषा चौधरी या पहूर येथील जळगाव मार्गावर राहत होत्या. त्या मनमिळाऊ स्वभावाच्या आणि मदतीसाठी तत्पर होत्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती कैलास तुळशीराम चौधरी, दोन मुले, सून आणि नातू असा परिवार आहे. त्या सचिन बावस्कर यांच्या भगिनी होत्या.

Protected Content