अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतात फवारणी करत असताना विहिरीत टाकलेल्या ईलेक्ट्रीक मोटारीच्या वायरला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील वावडे शेत शिवारात बुधवारी ३१ जुलैला दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मारवाड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गौरव दीपक माळी (वय २०, रा.वावडे ता.अमळनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील वावडे गावात गौरव माळी हा तरूण आपल्या परिवारासह राहत होता. गौरव हा धुळे येथे ‘बीसीए’चे शिक्षण घेत होता. काही दिवसांपासून तो सुट्टीवर घरी आला होता. बुधवारी ३१ जुलै रोजी शेतात वडिलांना मदत म्हणून गौरव हा फवारणीच्या कामासाठी गेला होता. दुपारी ३ वाजेच्या सुमारास फवारणी करताना विहिरीवर लावलेल्या मोटारच्या ईलेक्ट्रीक वायरचा स्पर्श त्याच्या मानेला झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. पावसामुळे जमीन देखील ओली असल्याने विद्युत प्रवाह संपूर्ण शरीरात गेला. यावेळी त्याचे वडील देखील शेतातच होते. घटनेनंतर त्याचे वडील व गावातील लोकांनी त्याला उपचारासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले.यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या घटनेबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास भरत ईशी हे करीत आहे.