जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाण्याच्या टाकीचे बांधकाम करत असतांना लोखंडी सळईचा विद्यूत तारेला धक्का लागल्याने परप्रांतीय बांधकाम मजूराचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील वडली गावात गुरूवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साहिल शेख रायउद्दिन शेख (वय-१९) रा. अमानत दिपारा, साहेबगंज, झारखंड असे मृत तरूणाचे नाव आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, साहिल शेख रायउद्दिन शेख हा तरूण दहा दिवसांपुर्वीच झारखंड राज्यातून जळगाव जिल्ह्यात कामाच्या निमित्ताने आलेला होता. जळगाव तालुक्यातील वडली येथे शासकीय योजनेतून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम जळगावातील ठेकेदार बबलू यांच्याकडे देण्यात आले आहे. याच ठेकदाराकडे साहिल शेख व त्यांचा भाऊ फिरदोस शेख हे कामाला होते. नेहमीप्रमाणे साहिल शेख हा गुरूवारी २० जुलै रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कामावर हजर झाला. पाण्याच्या टाकीचे स्लॅब टाकण्यासाठी लोखंडी सळई टाकण्याचे काम सुरू होते. जवळच महावितरण कंपनीच्या विद्यूत तारा गेलेल्या होत्या. यावेळी विद्यूत तारेला लोखंडी सळईचा धक्का लागल्याने विजेच्या धक्क्याने साहिल हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. दरम्यान, रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालविली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत साहिलच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ अतूल पाटील करीत आहे.