भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ शहरातील गांधीनगर येथे राहणाऱ्या वृद्धाचा फेकरी रोडवर स्पिडब्रेकरमुळे झालेल्या अपघातात जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महेंद्र मरान्ना स्वामी (वय-६३, रा. गांधीनगर भुसावळ) असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की भुसावळ शहरातील गांधी नगरात महेंद्र स्वामी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. फेकरी रोडवर त्यांची जीम चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवारी २६ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता फेकरी रोडवरील जीम उघडण्यासाठी रस्त्याने दुचाकीने जात असतांना त्यांचा स्पिडब्रेकरमुळे अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिक नागरिकांनी खाजगी वाहनातून भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल योगेश पालवे हे करत आहे.