जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेलेल्या ३५ वर्षीय तरूणाने मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना आसोदा रेल्वेगेट जवळ घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील श्रीरत्न कॉलनीमध्ये प्रशांत प्रभाकर गोपनारायण (वय- ३५, रा. श्रीरत्न कॉलनी, जळगाव) हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. मंगळवारी २६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ते घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले. काही वेळानंतर ते ईश्र्वर कॉलनीत राहणाऱ्या त्यांच्या मावसभावाकडे गेले. परंतू ते घरी मिळून आले नाहीत. त्यानंतर बुधवारी २७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास प्रशांत गोपनारायण यांनी असोदा रेल्वेगेट जवळील खांबा क्रमांक ४२८च्या २२ ते २४ दरम्यान, रेल्वेखाली स्व:ला झोकून देत आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माणिक सपकाळे, ज्ञानेश्र्वर कोळी व जयेंद्रसिंग पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रशांत यांच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे.