जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथील गिरणा नदीपात्रात हात-पाय धुण्यासाठी गेलेल्या मजुराचा पाय घसरल्याने गिरणेच्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजता घडली. सायंकाळी ५ वाजता आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाकडून घेण्यात आलेल्या शोधानंतर मृतदेह सापडला. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
किशोर श्रावण मराठे (वय-४०, म्हसावद) असे बुडून मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. किशोर मराठे हे गावात हातमजुरीचे काम करत होते. मंगळवारी १८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता घरातून निघाले, त्यानंतर सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रात हात-पाय धुण्यासाठी गेले. त्याठिकाणी अचानक पाय घसरल्याने डोहात पडल्याल बुडाले. कपडे धुणाऱ्या महिलेच्या लक्षात आल्याने परिरातील नागरीक व पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह हाती न लागल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता पथकातील कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह सापडला, जिल्हा रुग्णालयात मृतदेह दाखल केल्यानंतर सायंकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येवून, मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.