पत्नीवर चाकूने वार करून जखमी करणाऱ्या पतीला सक्तमजूरीची शिक्षा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरून परिसरात पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पतीला चार वर्षाची सक्त मजुरी व दंड अशी शिक्षा जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायाधिश शरद पवार यांनी मंगळवारी १८ जुलै रोजी दुपारी २ वाजता सुनावली आहे. विठ्ठल उर्फ विठ्या आत्माराम नेरकर रा. मेहरून परिसर, जळगाव असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, आरोपी विठ्ठल नेरकर हा पत्नी खातूनबी नेरकर यांच्यासोबत वास्तव्याला होता. त्याला दारू पिण्याची सवय होती, त्यामुळे काहीही कामधंदे न करता तो पत्नीशी वाद घालून मारहाण करत होता. १९ मार्च २०१८ रोजी दुपारी २ वाजता नेरकर दांपत्य आणि त्यांचा मुलगा इस्माईल हे घरी असताना दारू पिण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यात विठ्ठलने रागाने मुलगा इस्माईल याला कारण नसताना मारहाण केली. याचा जाब विचारल्यावरून रागाच्या भरात विठ्ठल याने मुलाला मारण्यासाठी पाठलाग केला. त्यावेळी पत्नी खातूनबी यांनी त्याचा रस्ता अडवला होता. त्यामुळे संतापाच्या भरात चाकूने पत्नीवर वार केले होते. या घटनेत खातूनबी नेरकर या गंभीर जखमी झाल्या होत्या. एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला जळगाव जिल्हा न्यायालयातील सत्र न्यायाधीश शरद पवार यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. यात पत्नी व मुलगा आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. मंगळवार १८ जुलै रोजी या खटल्याचे कामकाज झाले. न्यायालयाने विठ्ठल नेरकर याला दोषी ठरवत त्याला १ हजार रुपयाचा दंड आणि ४ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले. भैरवी अधिकारी हर्षवर्धन सपकाळे यांनी सहकार्य केले.

Protected Content