हरारे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भवितव्याची झलक दाखवत टीम इंडिया अंडर 19 संघाने आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात इंग्लंडवर 100 धावांनी दणदणीत विजय मिळवत भारताने सहाव्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावली आणि क्रिकेटविश्वात आपली वर्चस्वाची छाप पुन्हा एकदा पक्की केली.
आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण खेळ सादर केला. हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्णपणे योग्य ठरवला. वैभव सूर्यवंशीने केलेल्या अफलातून आणि चाबूक खेळीने भारतीय डावाला भक्कम आधार दिला.

वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या गोलंदाजांवर अक्षरशः वर्चस्व गाजवत 175 धावांची स्फोटक खेळी केली. त्याच्या या ऐतिहासिक खेळीत ताकद, तंत्र आणि संयम यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. वैभवच्या खेळीमुळे भारताने 50 ओव्हरमध्ये तब्बल 412 धावांचा डोंगराएवढा लक्ष्यांक उभा केला, जो अंतिम सामन्याच्या दडपणात इंग्लंडसाठी मोठे आव्हान ठरला.
412 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची फलंदाजी भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकली नाही. सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत इंग्लंडवर दबाव निर्माण केला. नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्याने इंग्लंडचा डाव सावरू शकला नाही आणि संपूर्ण संघ 40.2 ओव्हरमध्ये 311 धावांवर गारद झाला. यामुळे भारताने अंतिम सामन्यात 100 धावांनी एकतर्फी विजय साकारला.
या विजयासह भारताने अंडर 19 वर्ल्ड कप ट्रॉफीवर सहाव्यांदा आपले नाव कोरले. विशेष म्हणजे इंग्लंडविरुद्ध फायनलमध्ये वर्ल्ड कप जिंकण्याची ही भारताची दुसरी वेळ ठरली आहे. याआधी 5 फेब्रुवारी 2022 रोजी भारताने इंग्लंडला पराभूत करत पाचव्यांदा ही प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकली होती.



