मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ”देशात सर्वात पहिल्यांदा मंडल आयोग लागू करणारे शरद पवार साहेब आज देखील ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असून यासाठी सर्वांना नवीन लढा उभारावा लागेल” असे प्रतिपादन राष्ट्रवादी ओबीसी सेलचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी उमेश नेमाडे यांनी केले. ते राष्ट्रवादीच्या ओबीसी आरक्षणविषयक अधिवेशनात बोलत होते.
मुंबई येथील येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशन पार पडले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ओबीसी नेते छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, उद्योग तथा क्रीडा राज्य मंत्री आदिती तटकरे, ओबीसी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे, पक्षाचे सरचिटणीस शिवजीराव गर्जे, राज्य समन्वयक राज राजपुरकर, सतीश दरेकर, महाज्योतीचे गमे, लतीफ तांबोळी, राजू गुल्हाने, सोशल मीडिया प्रमुख अतुल राऊत, मनोज घोडगे, समाधान जेजुरकर, उत्तर महाराष्ट्र प्रभारी उमेश नेमाडे आदींची उपस्थिती होती.
या अधिवेशनात ओबीसी सेलचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी तथा भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले. ते म्हणाले की, देशातील इतर मागासवर्गियांच्या उत्थानासाठी तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोग अंमलात आणण्याची घोषणा केल्यानंतर याला देशात सर्वप्रथम लागू करण्याचे धाडस तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब यांनी केले. यामुळे राज्यातील अनेक लहान-सहान वंचित समूह घटनांना पुढे जाण्याची संधी मिळाली. उच्च शिक्षण आणि यातून चांगल्या करियरच्या संधी मिळाल्याने बहुजन समाजातील मुले ही प्रचंड गतीने पुढे गेली. आज यातील अनेक समाज समूहांचा ओबीसी आरक्षणामुळे कायापालट झाल्याचे दिसून येत असून याचे सर्वश्री श्रेय हे शरद पवार साहेबांना आहे.
उमेश नेमाडे पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने मंडल आयोग लागू करतांना विरोध केला होता. तर आज ओबीसींच्या आरक्षणावरच घाला घालण्याचे काम याच पक्षाच्या केंद्र सरकारने सुरू केले आहे. तेव्हा देखील शरद पवार हे योध्द्यासमन मैदानात उतरले आहेत. मनुवादी भाजपचा प्रतिकार करण्यासाठी महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचे जनक हे पवार साहेब असल्याची माहिती आजच्या सोशल मीडियातील फेक कंटेंटवर विश्वास ठेवणार्या नवीन पिढीला समजवावी लागेल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी नव्याने लढा उभारावा लागेल असे प्रतिपादन याप्रसंगी उमेश नेमाडे यांनी केले.