भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट पडून दोन गट झाल्यानंतर भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी अजितदादा पवार यांच्या गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांची रावेर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. पक्षाने रवींद्र नाना पाटील यांना हे पद दिले तरी त्याला तात्काळ स्थगिती देण्यात आली होती. यानंतर हे पद रिक्त होते.
दरम्यान, आज पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जळगाव जिल्हा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश नेमाडे यांची नियुक्ती जाहीर केली. याप्रसंगी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील, रवींद्र नाना पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
उमेश नेमाडे हे अभ्यासू नेते समजले जातात. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला त्यांच्या रूपाने उत्तम संघटक असणारा नेता मिळाला असून याचा तापी पट्टा परिसरात पक्षवाढीसाठी उपयोग होईल असे मानले जात आहे. तर या नियुक्तीबद्दल उमेश नेमाडे यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून स्वागत होत आहे.