नवी दिल्ली वृत्तसंस्था । नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) समर्थनासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघातर्फे आज राष्ट्रीय उलेमा परिषद घेण्यात आली. या परिषदेत मुस्लिमांच्या दोन गटांमध्ये वाद चिघळला असून हा प्रकरण हाणामारीपर्यंत गेल्याचे पाहायला मिळाले असून आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांच्या उपस्थिती हा सर्व प्रकार घडला आहे. देशभरातील उलेमा या परिषदेला उपस्थित होते.
काही प्रमुख मुस्लिम नेतेही या परिषदेसाठी आले होते. दरम्यान, परिषद सुरू असतानाच अचानक काही उपस्थितांनी सीएए आणि एनआरसी विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यांनी निषेधाचे फलकही झळकावले. त्यामुळे वादाची ठिणगी पडली. सीएए विरोधात घोषणा देणाऱ्यांना बाहेर हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला असता जोरदार राडा झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. वाढता तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि परिषदेत घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय मुस्लिम मंचाने या परिषदेचे आयोजन केले होते. सीएए व एनआरसी कायद्यांच्या समर्थनासाठी ही परिषद होती. या कायद्यांबाबत मुस्लिम समाजात जो गैरसमज पसरला आहे तो दूर करण्यासाठी ही परिषद असल्याचा दावा आरएसएसकडून करण्यात आला.