ब्रिटनमध्ये रंगला लेवा पाटीदार समाजबांधवांचा स्नेहमेळावा !

लंडन-अमर पाटील | संपूर्ण जगभरात आपल्या गुणवत्तेची मोहर उमटवणार्‍या व सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्यास असणार्‍या खान्देशातील लेवा पाटीदार समाजबांधवांचा दिवाळी स्नेहमेळावा नुकताच अतिशय उत्साहात पार पडला.

लेवा पाटीदार समाजबांधव मोठ्या संख्येने विदेशात आहेत. यात ब्रिटनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात हा समुदाय आहे. आपल्या मायभूमीपासून दूर राहून देखील आपली भाषा, संस्कृती, परंपरा, खाद्यसंस्कृती आदींचे जतन करण्याला यातील अनेक कुटुंबे प्राधान्य देत आहेत. यातच २०१६ पासून डॉक्टर नितीन कोल्हे आणि प्रस्तुत प्रतिनिधी अमर पाटील यांनी समाजबांधवांचा व्हाटसअप ग्रुप सुरू केला. यातून ब्रिटनमधील समाजबांधवांचा एकमेकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क आला. याच्याच माध्यमातून युके लेवा पाटीदार मंडळ देखील आकारास आले. यातून दिवाळी स्नेहमेळाव्याची संकल्पना समोर आली. यानुसार नुकताच हा मेळावा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

दिवाळी स्नेहमेळावा कार्यक्रमात पारंपरीक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन एकमेकांशी मनमुराद गप्पा मारण्यात आल्या. यात अनेकांचा एकमेकांशी परिचय झाला. लक्षणीय बाब म्हणजे शेखर ढाके आणि अतुल फिरके यांनी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासह मान्यवरांचा परिचय हा लेवा गणबोलीतून करून दिला. तर मुला-मुलींनी विविध सांस्कृतीक आणि गुणदर्शनपर कार्यक्रम सादर केले असता याला भरभरून दाद मिळाली.

या स्नेहमेळाव्याच्या यशस्वीतेसाठी अमर पाटील, अतुल फिरके, भूषण बोंडे, भूषण भारंबे, चंद्रशेखर ढाके, जितू पाटील, कुणाल धांडे, मिलींद चौधरी, डॉ. नितीन कोल्हे, श्रीकांत चोपडे, निखील नारखेडे, शुभम भारंबे, राजेश फालक, सुहास बर्‍हाटे यांच्यासह समाजबांधवांनी परिश्रम घेतले. अतिशय उत्साहपूर्ण आणि चैतन्यदायी वातावरणात हा स्नेहमेळावा पार पडला.

ब्रिटनमध्ये सुमारे एक हजारापेक्षा जास्त लेवा पाटीदार समाजबांधव राहत असून या सर्वांना कनेक्ट करण्याचे काम युके लेवा पाटीदार मंडळ करत आहे. अजून कुणी समाजबांधवांना संस्थेची माहिती नसेल त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून पेजशी कनेक्ट होण्याचे आवाहन देखील संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.

Protected Content