मुंबई प्रतिनिधी | जळगावचे थोर सुपुत्र तथा विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘मुंबई रत्न’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवरांना मुंबई रत्न पुरस्काराने गौरवान्वित केले. फिल्म्स टुडे, नाना-नानी फाउंडेशन आणि एनार ग्रुपतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांचा देखील समावेश होता. श्री. निकम यांनी हा पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते स्वीकारला.
या कार्यक्रमात ॲड. उज्ज्वल निकम यांच्यासह गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदि गोदरेज, मनपा आयुक्त इक्बालसिंग चहल, बांधकाम उद्योजक निरंजन हिरानंदानी, अधिवक्ता उज्ज्वल निकम, इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे अनंत गोयनका, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. गौतम भन्साळी, मंजू लोढा, पार्श्वगायक उदित नारायण, अनूप जलोटा, युनियन बँकेचे चेअरमन राजकिरण राय, डॉ. शोमा घोष, आशिष चौहान आदींचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ज्ञ हे सर्व जण आपापल्या परीने समाजात योगदान देत आहेत. परंतु प्रत्येकाने देशाला स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच गरीबी निर्मूलनासाठी आरोग्य सेवा व शिक्षण देऊन अधिकाधिक समाजात योगदान द्यावे असे आवाहन राज्यपालांनी याप्रसंगी केले.