धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गाडी क्रमांक 09059/60 उधना-खुर्दा रोड (पूर्वीची सुरत-ब्रह्मपूर) साप्ताहिक एक्सप्रेसला धरणगाव येथे थांबा मिळाल्याबद्दल धरणगाव रेल्वे स्थानकावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. स्थानिक नागरिक आणि खान्देश प्रवासी असोसिएशनच्या वतीने गाडीचे स्वागत करण्यात आले, तसेच लोको पायलटचा सत्कार करण्यात आला. या निर्णयाबद्दल खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांचे खान्देश प्रवासी असोसिएशन आणि धरणगाव वासियांनी विशेष आभार मानले.
ही गाडी 12 मार्च 2025 पासून सुरु झाली असून ती 2 मे 2025 पर्यंत धावणार आहे. धरणगावहून ही गाडी दर शनिवारी सकाळी 8.53 वाजता नंदुरबार आणि सुरत दिशेने प्रस्थान करेल. ही सेवा प्रवाशांसाठी मोठा फायदा ठरणार आहे, कारण धरणगावहून डायरेक्ट नंदुरबार आणि सुरत पर्यंत प्रवास शक्य होणार आहे. ही गाडी दर बुधवारी दुपारी 4.30 वाजता धरणगावहून जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर आणि ब्रह्मपूर (खुर्दा रोड) दिशेने धावेल.
गाडीच्या धरणगाव स्थानकावरील स्वागत सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये भाजपा तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, खान्देश प्रवासी असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश तिवारी, उपाध्यक्ष चंद्रकांत भावसार, सचिव श्रेयांस जैन, सहसचिव ऍड. नंदन पाटील, खजिनदार प्रतीक जैन, सदस्य युवराज रायपूरकर, दिनेश पाटील, प्रशांत भाटिया, नारायण महाजन, संभाजी सोनवणे आणि जतीन नगारिया यांचा समावेश होता. या नव्या थांब्यामुळे धरणगाव आणि परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. प्रवाशांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन खान्देश प्रवासी असोसिएशन, धरणगाव यांनी केले आहे.