मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ज्यांना पक्षातून जायचे आहे त्यांनी नाटके न करता जावे असे बजावत आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्षत्याग करणार्यांना फटकारले. यासोबत राज्यातून ५० लाख शिवसैनिकांचे प्रतिज्ञापत्र जमा करण्याचे टार्गेट देखील त्यांनी पदाधिकार्यांना दिले आहे.
शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही. आधी आमदारांनी आणि आज खासदारांनी वेगळी चूल मांडली असून ठिकठिकाणचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी देखील शिंदे गटात सहभागी होत आहेत. या पार्श्वभूमिवर, आज उध्दव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. यात त्यांनी बंडखोरांबाबत अतिशय कठोर भूमिका घेतल्याचे दिसून आले.
उध्दव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेच्या बळावर अनेक जण मोठे झाले, आणि आज निघून गेले आहेत. मात्र आपण मागे वळून पहायचे नाही. आपल्याला लढायचे आहे. गद्दार निघून गेले असले तरी निष्ठावंत शिवसैनिक आपल्यासोबत आहेत. राज्यभरातून ५० लाख शिवसैनिकांच्या निष्ठेचे प्रतिज्ञापत्र आपल्याला जमा करायचे आहे. यानंतर आपण राज्यभरात दौरा करणार असल्याची माहिती देखील उध्दव ठाकरे यांनी याप्रसंगी दिली.