खेड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | येथे आज माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विराट सभेत एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती हल्ला चढविला.
खेड येथील गोळीबार मैदानावर आज सायंकाळी उध्दव ठाकरे यांची सभा पार पडली. यात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात अपेक्षेनुसार त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले की, दुर्देवं असं की ज्यांना आपण कुटुंबीय मानलं. ज्यांना मोठं केलं. त्यांनीच आपल्या आईवर वार केलाय. होय, शिवसेना ही आपली आई आहे. शिवसेना ही चार अक्षरं नसती तर तुम्ही-मी कोण होतो? आज जे टिमक्या वाजवत आहेत की, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. तुमचा जन्म तेव्हा कदाचित झाला असेल, मुंबईनंतर पहिला भगवा इथे फडकला होता, असे सांगत त्यांनी हल्लाबोल केला.
उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, जे शिवसेना तोडण्याचा फोडण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न करत आहात त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही नेमकं काय करताय ते तुम्हाला लक्षात येत नाहीय. तुम्ही शिवसेना फोडण्याचा प्रयत्न नाही तर तुम्ही मराठी माणसाच्या एकजुटीवर घाव घालण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही हिंदूंच्या एकजुटीवर घाव घालण्याचा प्रयत्न करत आहात. रावणाला देखील शिवधनुष्य पेलवले नाही आणि तो उताणा पडला. मग मिंधे काय उभा राहणार ? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी टिका केली.