मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | उध्दव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपल्या गटासाठी नवीन नावाची मागणी केली आहे.
काल रात्री केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यास देखील मज्जाव केला आहे. ठाकरे आणि शिंदे यांनी आपल्या पक्षाचे नाव आणि चिन्हे यांचे प्रत्येकी तीन पर्याय सादर करण्यासाठी सोमवारी दुपार पर्यंतची मुदत देखील देण्यात आलेली आहे.
दरम्यान, उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसेना हे नाव वापरू शकणार नसले तरी ते आपल्या पक्षाच्या नावात शिवसेना वापरू शकणार आहेत. या पार्श्वभूमिवर, उध्दव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपल्या गटासाठी ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मागितले आहे. तर, ठाकरे गट नेमकी कोणती निशाणी मागणार याची माहिती समोर आली नसली तरी उध्दव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलींद नार्वेकर यांनी ट्विटमधून पक्षाची नवी निशाणी ही डरकाळी फोडणारा वाघ असेल असे सुचविले आहे. अर्थात, उध्दव ठाकरेंना आपल्या पक्षाचे नाव शिवसेना-बाळासाहेब ठाकरे हे हवे असून त्यांना वाघ ही निशाणी हवी असल्याचे ताज्या घडामोडींमधून स्पष्ट झाले आहे.
तर दुसरीकडे दोन्ही गटांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. उध्दव ठाकरेंनी दुपारी बारा वाजता आपल्या निकटच्या सहकार्यांची बैठक बोलावली आहे. तर शिंदे गटाच्या मंत्र्यांची देखील आज बैठक होणार असून यात पुढील घडामोडींबाबत रणनिती ठरविण्यात येईल अशी शक्यता आहे.