मुंबई वृत्तसंस्था । क्रिकेटमधून एकदा निवृत्ती जाहीर केल्यानंतर पुन्हा यु-टर्न घेण्याचा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. याआधी भारताचा अंबाती रायडू, वेस्ट इंडिजचा ड्व्हेन ब्राव्होनं असाच यु-टर्न घेण्याचा निर्णय घेतला होता. आता आणखी एक दिग्गज गोलंदाज निवृत्ती मागे घेण्याच्या विचारात आहे.
आपल्या भेदक गोलंदाजीने श्रीलंकेच्या यशात अनेकदा मानकरी ठरलेला वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा २६ जुलै २०१९ ला बांगलादेशविरुद्ध पहिल्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. पण टी-२० विश्वचषक २०२० या स्पर्धेनंतर मलिंगा टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची माहिती दिली आहे. त्या निवृत्तीच्या निर्णयावर मलिंगाने यु-टर्न घेतला आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा होण्याची मी वाट पाहतो आहे. मला श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे की टी-२० विश्वचषकासाठी मी संघाचे नेतृत्व करेन. पण श्रीलंकेत काहीही होऊ शकते. टी-२० क्रिकेटमध्ये केवळ ४ षटके टाकायची असतात. त्यामुळे मला असं वाटतं की मी टी-२० दीर्घकाळ खेळू शकतो. कर्णधार म्हणून मी जगभरात इतके टी-२० सामने खेळले आहेत की मी अजून दोन वर्षे सहज टी-२० क्रिकेट खेळू शकेन, असे सांगत मलिंगाने निवृत्तीचा निर्णय लांबणीवर ढकलला.