भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील दोन तरूणांचा तापी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला असून तिघांना मात्र वाचविण्यात यश आले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सध्या प्रचंड कडाक्याचे उन पडत असून पारा चढलेला आहे. जीवाची काहिली होत असल्यामुळे अनेक जण तापी नदीपात्रात पोहण्यासाठी जात असतात. यातच नदीपात्रातील इंजिन घाट या बंधार्यावर तर दररोज शेकडो तरूणांची पोहण्यासाठी गर्दी होत असते. सध्या तापमानाचे उच्चांक गाठलेला असतांनाच पोहणार्यांच्या संख्येतही विक्रमी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर इंजिन घाटाच्या पुढे असलेल्या नदीवरील जुन्या पुलाच्या भागात देखील पाण्याचा साठा असल्याने येथेही तरूण पोहायला जातात.
दरम्यान, आज सायंकाळी शहरातील खडका रोड भागातील काही तरूण हे तापी नदीच्या पात्रात लहान पुलाजवळच्या भागात पोहण्यासाठी गेले होते. यात नदीच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे अंकुश ठाकूर आणि शेख दानीश ( दोन्ही रा. ग्रीन पार्क, खडका रोड भुसावळ ) हे दोन तरूण बुडाले असून तीन जणांना मात्र वाचविण्यात यश आले आहे. ही दुर्घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली असून बुडालेल्या मुलांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
( ही बातमी आताच समोर आली असून याचे नवीन अपडेट आम्ही लागलीच देत आहोत. )