नांदेड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नांदेड जिल्ह्यात दोन जणांचा अपघात मृत्यू झाला आहे. किनवट तालुक्यात ही घटना घडली आहे. जोरदार धडक बसल्यानंतर चक्काचूर झालेली दुचाकी ट्रक खाली आली. त्यामुळे पेट्रोलची टाकी फुटून पेट घेतला आणि आगीच्या भडक्यात ट्रक जळून खाक झाला. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच तर दुसऱ्याचा गंभीर जखमी होऊन उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. ही घटना नांदेड महामार्गावरील सावरी घाटामध्ये रविवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली.
किनवट तालुक्यातील येंदापेंदा जवळील नागडोह या गावचे रहिवासी माधव दादाराव कार्लेवाड व शिवाजी कोंडबा तिगलवाड हे दोघेही दुचाकीने तेलंगणातील आडेली पोच्चव्वा येथे देवीच्या दर्शनासाठी नांदेडमार्गे शिवणी फाट्याकडे जात होते. बोधडी ओलांडून सावरी घाटात आल्यानंतर समोरून सुसाट वेगाने येणाऱ्या एक ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली. त्यात त्यांची दुचाकी ट्रकखाली येऊन ते सुमारे एक ते दीड फर्लांग फरफटत गेले. त्यात दुचाकीच्या मागे बसलेले शिवाजी तिगलवाड हे जागीच ठार झाले तर चालक शिवाजी कार्लेवाड हे गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, ट्रकखाली आलेल्या दुचाकीचे अक्षरश: तुकडे उडून रस्त्यावर विखुरल्या गेले. त्यातच पेट्रोल टाकी फुटल्याने आगीचा भडका उडून ट्रकनेही भीषण पेट घेतला.
दरम्यान रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी प्रसंगावधान राखून आग विझवण्याचा प्रयत्न केला. काहींनी मृत व जखमीस गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेत असतांना जखमी माधव कार्लेवाड यांचा वाटेतच मृत्यू झाला. रुग्णालयात कर्तव्यावरील डॉ. मुंगळकर यांनी जखमी माधव यास तपासल्यानंतर मृत घोषित केले. येंदापेंदाचे उपसरपंच शिवाजी व्यंकटी भताने यांचेसह ग्रामस्थ व नातेवाईकांनी पार्थिव ताब्यात घेतले. राजू तिगलवाड याने किनवट ठाण्यात अपघाताची फिर्याद नोंदवली. अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.