जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव, धुळे व नंदुरबार येथून चोरी करुन आणलेल्या सराईत दुचाकी चोरटा गोपाळ भाईदास शिरसाठ (वय २३, मूळ रा. पिळोदा, ता. शिरपूर जि. धुळे., ह. मु. बेस्तान, जि. सुरत, गुजरात) याच्या एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. त्याच्याविरुद्ध अनेक ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सराईत दुचाकी चोरटा गोपाळ शिरसाठ हा ह. मु. गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यातील बेस्तान येथे वास्तव्यास आहे. हा सराईत चोरटा बनावट चावीच्या सहाय्याने दुचाकींची चोरी करुन त्याची विक्री करीत होता. तो शहरातील अजिंठा चौफुली परिसरात असल्याची माहिती मिळताच सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. संशयित गोपाळ शिरसाठ याची एमआयडीसी पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने आपण जळगाव, धुळे व नंदुरबार याठिकाणाहून दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या ११ विनाक्रमांकाच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे.
अनेक ठिकाणी गुन्हे दाखल
संशयिताने जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १, अमळनेर येथून २, धुळे जिल्ह्यातील शिरपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३, देवपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १, दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १, नंदुरबार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १ अशा दहा दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याविरुद्ध याठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
या पथकाची कामगिरी
ही कामगिरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोनि अमोल मोरे, पोउनि आनंदसिंग पाटील, दीपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, पोना विकास सातदिवे, किशोर पाटील, स्वप्निल पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, पोकॉ हेमंत पाटील, चंद्रकांत पाटील, ईश्र्वर भालेराव, पोहेकॉ इतियाज खान यांच्या पथकाने केली. पुढील तपास विकास सातदिवे हे करीत आहे.