जळगाव प्रतिनिधी । शहरातील दादावाडी परिसरातील एकविरा हॉटेल जवळून दुचाकी चोरणाऱ्या संशयित आरोपीला तालुका पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील दादावाडी परिसरात गुरूवारी ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दोन जण दुचाकीवर संशयास्पद हालचाली करत असल्याची गोपनिय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली.
त्यानुसार पोलीस नाईक दिनेश पाटील, विश्वनाथ गायकवाड, पो.कॉ. भूषण सपकाळे, प्रशांत ठाकूर यांनी कारवाई करत दुचाकीवर फिरणाऱ्या संशयित आरोपी सोहेल युसूफ अली (वय-१९) रा. रजा टॉवर, जाम मोहल्ला, ईराणी गल्ली भुसावळ याला ताब्यात घेतले. तर दुसरा संशयित आरोपी सुलतान जावेद जाफरी उर्फ लल्ला रा. रजा टॉवर, भूसावळ हा त्याच्या सोबत असलेली चोरीची दुचाकी घेवून पसार झाला.
संशयित आरोपी सोहेल याची कसून चौकशी केली असता त्याने दादावाडी परिसातील एकविरा मंदिराजवळून ९ सप्टेंबर रोजी दुचाकी चोरी केल्याचे कबुली दिली आहे. सोबत पाचोरा, जामनेर आणि वरणगाव येथून प्रत्येकी दोन मोबाईलची चोरी केल्याचे कबुली दिली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी १० डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली. पुढील तपास पोकॉ अनिल मोरे करीत आहे.