जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या चोरट्याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे शहरातून आज दुपारी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या तब्बल २७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयितावर जळगाव, धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
योगेश शिवाजी दाभाडे रा. बळसाने ता.साक्री जि.धुळे असे अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, “जळगाव शहर, पारोळा आणि अमळनेर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्याच्या सुचना पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी स्वतंत्र पथक तयार केले. यात पोहेकॉ संदीप पाटील, पो.ना. प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, पोहेकॉ विजय चौधरी यांना गुन्ह्यातील आरोपींच्या शोधकामी सूचना केल्या.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आज बुधवार, दि. २७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता धुळ्यातून संशय आरोपी योगेश शिवाजी दाभाडे याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने पारोळा शहरातून चोरून नेली दुचाकीचा गुन्हा कबूल केला आहे. यापूर्वी देखील पारोळा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत संशयिताने दुचाकी चोरी केली होती. या गुन्ह्यात तो फरार होता. त्याचप्रमाणे त्याच्यावर जळगाव शहर, पारोळा, अमळनेरसह धुळे आणि नाशिक जिल्ह्यात वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या संशयित आरोपीकडून तब्बल २७ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पुढील कारवाईसाठी त्याला पारोळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.