जळगाव प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील महुखेडा गावाजवळ दुचाकींची समोरासमोर झालेल्या अपघातात सुभाषवाडीतील पवन भिका जाधव व अंकुश भाईदास चव्हाण हे दोघं मित्र जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सुभाषवाडी येथील रहिवासी पवन जाधव आणि अंकुश चव्हाण हे त्याच्या एका मित्रासह (नाव माहित नाही) जामनरे तालुक्यातील महुखेडा येथे लग्नाला गेले होते. दुपारी लग्न आटोपून तिघेही एकाच दुचाकीवरून घरी येण्यासाठी निघाले़ पवन व अंकुश याचा मित्र दुचाकी चालवत होता़ गावाच्या काही अंतरावर गेल्यानंतर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. अपघातानंतर दुचाकी चालवणारा मित्र हा घटनास्थळावरून पसार झाला. तर पवन आणि अंकुश हे दोघं जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले होते. अखेर नागरिकांच्या मदतीने त्यांना सायंकाळी जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दोघांना हाता-पायाला दुखापत झाली आहे.