चाळीसगाव येथून दोन अट्टल चोरटे ताब्यात : दोन वाहने जप्त

 

चाळीसगाव, प्रतिनिधी | चोरीची मोटारसायकल घेवून शहरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघांना काल (दि.५) येथील पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. त्यांच्यापैकी एकावर एक कार आणि दोन मोबाईल चोरीचाही आरोप आहे. त्यांच्याकडून आणखीही काही चोरीची वाहने मिळण्याची शक्यता आहे.

 

अधिक माहिती अशी की, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी सापळा लावून भिकन ताराचंद पवार (वय २७) व योगेश छन्नुसिंग राठोड (वय २३) या दोघांना ताब्यात घेतले असता चाळीसगाव जवळील कोदगाव चौफुली भागातील फौजदार ढाबा समोरुन चोरलेली व कन्नड (जि.औरंगाबाद) येथून चोरलेली अशा दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. याशिवाय भिकन पवार याने आपल्या इतर साथीदारांसह हडपसर (पुणे) येथून सहा लाख रुपये किमतीची होंडा मोबीलिओ कार व दोन मोबाईल हॅण्डसेट व रोख रक्कम चोरल्याचाही आरोप आहे.

त्याबद्दल कन्नड येथे दरोड्याचा गुन्हा दाखल असून त्याच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली आहे. हा मात्र तेव्हा पासूनच फरार होता. येथील शहर पो.स्टे.चे पो.उ.नि. महावीर जाधव, पो.ना. राहुल पाटील, अभिमन पाटील, विजय  शिंदे, पो.काँ. गोवर्धन बोरसे, प्रविण सपकाळे, संदिप पाटील, दिपक पाटील, विनोद खरनार, विजय पाटील, सतिश राजपूत या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास पो.हे.कॉ. बापुराव फकिरा भोसले हे करीत आहेत.

Protected Content