नवी दिल्ली वृत्तसंस्था । दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने घातपाताच्या तयारीत असणार्या दोन दहशतवाद्यांना अटक केली असून ते जैश-ए-मोहंमद या संघटनेचे सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीत घातपात घडवून आणण्याचा मोठा कट पोलिसांच्या सतर्कतेने उधळून लावण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीमध्ये स्फोट घडवून आणण्याचा कट रचला गेला होता आणि पकडण्यात आलेले दहशतवादी हा स्फोट घडवून आणणार होते अशी माहिती मिळाली आहे.
पोलिसांना दिल्लीत घातपात घडवण्यासाठीचा कट शिजत असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी खबर्यांचे जाळे सक्रीय करत दहशतवाद्यांबाबत माहिती मिळवली होती. पोलिसांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी योजना तयार केली होती. सोमवारी रात्री सव्वादाच्या सुमारास पोलिसांनी या दहशतवाद्यांना सरायकाले खाँ भागातील मिलेनियम पार्कजवळ पकडलं. या दोघांकडून त्यांना शस्त्रास्त्रे मिळाली आहेत. त्यांची आता कसून चौकशी करण्यात येत आहे.