श्रीनगर वृत्तसंस्था । आज पहाटे सुरक्षा यंत्रणांसोबत झालेल्या चकमकीत जम्मू-काश्मिरातल्या शोपिया परिसरात दोन दहशतवादी ठार झाले आहेत.
आज पहाटे शोपिया परिसरातील दरमदोरा या भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. यानुसार या भागात वेढा घालण्यात आला. यात दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर जवानांनीही याला जोरदार प्रत्युत्तर दिले. या धुमश्चक्रीमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून या भागात अजून काही अतिरेकी दडून बसल्याची शक्यता आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.