नीट पेपरफुटीप्रकरणी लातूरातून दोन शिक्षकांना अटक

लातूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. आता नीटच्या पेपरफुटीप्रकरणी लातूर कनेक्शन उघड झाले आहे. या पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातून दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) पेपरफुटीचे धागेदोरे आता खासगी कोचिंग क्लासेसची फॅक्टरी बनलेल्या लातूरपर्यंत पोहोचले आहेत. नांदेडच्या एटीएस पथकाने लातूरमध्ये दोन ठिकाणी छापेमारी केली आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी अटक करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत.

पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा संशय एटीएसला आहे. नांदेड एटीएसने या दोन्ही शिक्षकांना रात्री उशीरा ताब्यात घेतले. लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा (ता. चाकूर) येथील रहिवासी आहे. ते सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. तर, लातूरच्या अंबाजोगाई रोड भागात राहणारे जलील उमरखाँ पठाण हे तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आहेत. संजय जाधव व जलील उमरखाँ पठाण हे दोघेही पीएचडीधारक आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक असले तरी ते लातूरमध्ये खासगी क्लासेसही घेतात. नीटचा पेपर फोडून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरुन त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

Protected Content