जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात विविध भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या दोन भामट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज शुक्रवारी दुपारी पाळधी येथून अटक केली आहे. दोन्ही चोरट्यांनी एरंडोल, यावल आणि पारोळा तालुक्यातून चोरलेल्या तीन दुचाकी काढून दिले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरींचे प्रमाण वाढल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख, नरेंद्र वारुळे, नितीन बाविस्कर, राहूल पाटील, प्रितम पाटील, राजेंद्र पवार, भारत पाटील यांचे पथकाला रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून संशयित आरोपी प्रवीण संभाजी पाटील (वय-३०) रा. ब्राम्हणे ता. एरंडोल याला अटक करून त्याच्या ताब्यातील दुचाकीची चौकशी केली असता त्याने ही दुचाकी एरंडोल तालुक्यातून एक वर्षापुर्वी चोरली होती. त्याच्या सोबत असलेला दुसरा साथिदार सागर सुभाष धनगर (वय २२) रा. निमगाव ता. यावल यालाही अटक केली आहे. दोघांनी जळगाव जिल्ह्यातील यावल, एरंडोल आणि पारोळा तालुक्यातून चोरलेल्या तीन दुचाक्या काढून दिल्या आहेत. दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना पुढील कारवाईसाठी एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.