पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस गु.र.नं. ४०/२०२५ अन्वये भादंवि कलम ३०३ (२) अंतर्गत शेतकऱ्याच्या शेतातील मोटार चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक ०४ मार्च २०२५ रोजी फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर पारोळा पोलीसांनी तत्काळ तपास सुरू केला.
वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते (अमळनेर उपविभाग) यांनी चोरीच्या गुन्ह्यांवर विशेष लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने, प्रभारी अधिकारी सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोस्टे डी.बी. पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला.
तपासादरम्यान, पोउपनि अमरसिंग डी. वसाव, पोना संदिप सातपुते, पोकों अभिजित पाटील, पोकों विजय पाटील यांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी योगेश उर्फ सुर्या रमेश पाटील (रा. शेवगे बु, ता. पारोळा, जि. जळगाव) आणि योगेश उर्फ खगेश शालीक मगर (रा. साकुर, ता. मालेगाव, जि. नाशिक, ह.मु. पारोळा) यांना ताब्यात घेतले. कसून चौकशीनंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील विजकीय मोटारी चोरल्याची कबुली दिली.
४ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी १६:१४ वाजता आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोना संदिप सातपुते करीत आहेत.
जप्त मुद्देमाल:
७ एच.पी. सोनेरी रंगाची विजकीय मोटार – किंमत: रु. १८,०००/-
५ एच.पी. टेक्समो कंपनीची विजकीय मोटार – किंमत: रु. १५,०००/-
५ एच.पी. केल्वीन कंपनीची विजकीय मोटार – किंमत: रु. १५,०००/-
३ एच.पी. जुनाट विजकीय मोटार – किंमत: रु. ४,०००/-
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत रु. ५२,०००/-
सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.