महिलेच्या गळ्यातून सोन्याची मंगलपोत दुचाकीवरील दोघांनी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गुड्डू राजा नगरातील निर्मला रेसीडन्सी जवळ दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन जणांनी शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील १ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र खेचून चोरून दुचाकीने पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उषा शशिकांत हिंगोणेकर वय ५७ रा. निर्मला रेसीडन्सी, गुड्डू राजा नगर, जळगाव या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. ५ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता उषा हिंगोणेकर या महिला घराच्या बाहेर शतपावली करत असतांना दुचाकीवर अज्ञात दोन आले. त्यांनी महिलेच्या गळ्यातील १ लाख रूपये किंमतीची सोन्याची मंगलपोत गळ्यातून खेचून दुचाकीने पसार झाले. ही घटना घडल्यानंतर महिलेने आरडाओरड केली, परंतू तोपर्यंत चोरटे मुद्देमाल घेवून पसार झाले. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश पाटील हे करीत आहे.

Protected Content