जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव भुसावळ महामार्गावरील कार बाजार समोर कारमधील अज्ञात 4 जणांनी दुचाकीवर असलेल्या दोन जणांना काहीही कारण नसताना शिवीगाळ करत मारहाण करून डोक्यात लाकडी दांडका टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना मंगळवार 21 मे रोजी दुपारी 4 वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरुवार 23 मे रोजी सायंकाळी 6 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिमांशू ज्ञानेश्वर पांडे वय-20 रा. खोटे नगर गौरव पार्क, जळगाव हा तरुण आपला मित्र साहिल सपकाळे यांच्यासोबत 21 मे रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास दुचाकीने जळगावकडून भुसावळकडे जात असताना कार बाजार जवळ समोरून येणाऱ्या कारमधील अज्ञात चार जणांनी काहीही कारण नसताना त्यांची दुचाकी थांबवून हिमांशू पांडे आणि त्याचा मित्र साहिल सपकाळे या दोघांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाने लाकडी दांडक्याने हिमांशू याच्या डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी गुरुवार 23 मे रोजी सायंकाळी 6 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करीत आहे.