मालेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मालेगाव येथील माजी महापौर तथा एमआयएम पक्षाचे महानगर प्रमुख अब्दुल मालिक यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आले आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मालिक हे रविवारी रात्री एकच्या सुमारास जुना राष्ट्रीय महामार्गावरील पिवळा पंप भागात आपल्या मित्रांसह एका दुकानाच्या बाहेर बसले होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार केला. यात तीन गोळ्या लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मालिक यांना प्रारंभी येथील एका खासगी रुग्णालयात, नंतर नाशिकला हलविण्यात आले. गोळीबारानंतर हल्लेखोर लगेच पसार झाले होते.
या प्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. पथकाला या गुन्ह्याची उकल करण्यात यश आले असून दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. शेख मन्सूर शेख बसीर आणि खलील अहमद अब्दुल रज्जाकअशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. म्हाळदे शिवारातील एका जमिनीच्या वादातून हा गोळीबार करण्यात आल्याची कबुली संशयितांनी पोलीस तपासादरम्यान दिली असल्याची माहिती अप्पर अधीक्षक अनिकेत भारती यांनी दिली. संशयितांकडून एक बंदूक, दोन जिवंत काडतुसे व दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.