सोलापूरात वीज कोसळून दोन ठार; एक जखमी

सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने सोलापूर जिल्ह्यात दाणादाण उडवत दमदार हजेरी लावत असतानाच वीज कोसळण्याच्या पाच घटना घडल्या. यात दोन वृध्दांचा मृत्यू झाला. तर अन्य एक वृध्द शेतमजूर गंभीर भाजून जखमी झाला. अन्य दोन घटनांमध्ये दोन कारखान्यांवर वीज कोसळून लाखोंचे नुकसान झाले. दुसरीकडे या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील दुष्काळ दूर होण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून सांगोला व मंगळवेढ्यासारख्या भागात पावसाचा जोर दिसून येतो. या पावसामुळे सांगोला तालुक्यातील एरव्ही कोरडी ठणठणीत राहणारी कोरडा नदीला पाणी आले आहे. ओढे-नालेही भरून वाहू लागले आहेत.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुर्देहळ्ळी गावच्या शिवारात शेतात शेळ्या राखताना अंगावर वीज कोसळल्याने आमसिध्द अमृत गायकवाड यांचा मृत्यू झाला. त्यांच्या दोन शेळ्याही मृत्युमुखी पडल्या. दुसरीकडे याच दक्षिण सोलापूर तालुक्यात वळसंग येथून दुचाकीवर बसून कुंभारीत घराकडे परत निघालेले बिळेणी नागप्पा डचके हे वाटेत विजेचा जोरदार कडकडाट होऊन जवळच वीज कोसळली. तेव्हा डोळे दिपून घाबरलेले डचके हे चालत्या दुचाकीवरून क्षणात तोल जाऊन खाली कोसळले आणि बेशुध्द झाले. त्यांना रूग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. वीज कोसळताना घाबरून हृदयक्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अधिका-यांनी काढला. या दोन्ही घटनांची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली आहे. वीज कोसळण्याची तिसरी घटना सोलापूर शहरानजीक दोड्डी (ता. दक्षिण सोलापूर) येथे घडली. शेतात पाऊस पडताना वीज कोसळली. यात शंकर राठोड हे गंभीर भाजून जखमी झाले. त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुसरीकडे शहरात अक्कलकौट रस्त्यावर कोंडानगर परिसरात एका शिलाई कारखान्याच्या गोदामावर वीज कोसळून त्यात लाखो रूपयांचे नुकसान झाले. सुरेश अंबुरे यांच्या मालकीच्या या कारखान्यातील साठ्यासह यंत्रसामुग्री जळून गेली. करमाळा तालुक्यातील देवळाली येथेही सचिन अरूण कानगुडे यांच्या मालकीच्या टायर रिमोल्डींग कारखान्यावर वीज कोसळून त्यात मोठे नुकसान झाले.एकुकडे वीज कोसळून जीवित आणि वित्तहानीच्या दुर्घटना घडत असताना दुसरीकडे जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पडणा-या दमदार पावसामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे. सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी लागत आहे. सांगोला तालुक्या त २६.५ मिलीमीटर तर मंगळवेढा तालुक्यात २२ मिमी पाऊस पडला. सलग पडणा-या या पावसामुळे सांगोल्यातील कोरडा नदीला पाणी आले आहे. एरव्ही ही नदी कोरडीच राहते. जिल्ह्यात आठवडाभरात सर्वाधिक १२०.९ मिमी पाऊस करमाळा तालुक्यात तर १०२.९ मिमी पाऊस मोहोळ तालुक्यात झाला आहे. बार्शी तालुक्यात केवळ ३७.७ मिमी पाऊस झाला असून खरीप हंगामात सोयाबीन लागवडीसाठी तयारुत असलेले तेथील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

Protected Content