Home क्राईम दोन सराईत चोरटे जेरबंद ; ४३ तोळे सोन्यासह ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त...

दोन सराईत चोरटे जेरबंद ; ४३ तोळे सोन्यासह ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

0
119

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । कोल्हापूर जिल्ह्यासह सांगलीच्या सीमाभागात बंद घरांची कुलुपे तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कोल्हापूर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४३ तोळे ७०० ग्रॅम वजनाचे सोने-चांदीचे दागिने जप्त केले असून, ५३ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. प्रल्हाद विठ्ठल कवठेकर (रा. तारदाळ, हातकणंगले) आणि उदय श्रीकांत माने (रा. यड्राव) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

पोलीसांनी केली अशी रेकी :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही तरुण बेरोजगार होते. कामधंद्याच्या शोधात असल्याचा बहाणा करत ते दिवसा इचलकरंजी आणि परिसरातील बंद घरांची रेकी करायचे. त्यानंतर रात्रीच्या वेळी त्या घरांची कुलुपे तोडून घरातील मौल्यवान ऐवज लंपास करायचे, अशी त्यांची चोरीची निश्चित पद्धत होती. शहापूर, हातकणंगले, कुरुंदवाड या कोल्हापूरसह सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी अनेक चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.

गुप्त माहिती आणि सापळा :
परिसरात वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तपास गतिमान करण्याचे निर्देश दिले होते. याच दरम्यान, शहापूर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला हे चोरटे यड्राव परिसरात चोरीचे दागिने विकायला येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी त्वरित सापळा रचून कवठेकर आणि माने यांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्यांच्याकडून ४३ तोळे सोने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल तसेच मोबाईल जप्त करण्यात आला.

सोनारांवर कारवाईची मागणी :
जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत या यशस्वी कारवाईची माहिती दिली. दरम्यान, सराईत चोरटे जेरबंद होत असताना चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सोनारांवरही कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. सोनारांबाबत तपास सुरू असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली.


Protected Content

Play sound