Home धर्म-समाज ‘हिंद दी चादर’ निमित्त नांदेडमध्ये दोन दिवशीय कार्यक्रमाचे आयॊजन

‘हिंद दी चादर’ निमित्त नांदेडमध्ये दोन दिवशीय कार्यक्रमाचे आयॊजन


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी, धार्मिक स्वातंत्र्य आणि सत्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहेब जी यांचा ३५० वा शहिदी दिवस भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. नांदेड येथील मोदी मैदान, वघाडा येथे २४ व २५ जानेवारी रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत दोन दिवसीय शहिदी शताब्दी समागमाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शासन स्तरावर होत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात येत असून सुरक्षा, वाहतूक आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधांचे काटेकोर नियोजन सुरू आहे.

या संदर्भात पारोळा येथील तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ. उल्हासराव देवरे आणि नायब तहसीलदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत बंजारा व सिंधी समाजाची संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीत कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला तसेच पारोळा तालुक्यातून किती भाविक या शहिदी समागमासाठी जाणार आहेत याची माहिती प्रशासनाने घेतली.

श्री गुरु तेग बहादुर साहेब जी हे केवळ शीख समाजाचेच नव्हे तर संपूर्ण मानवजातीचे मार्गदर्शक होते. धार्मिक स्वातंत्र्य, सत्य आणि अन्यायाविरोधातील लढ्यासाठी त्यांनी दिलेले बलिदान आजही प्रेरणादायी आहे. या पवित्र प्रसंगी शीख, सिकलीगर, बंजारा, सिंधी, लबाना, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन तसेच भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय एकत्र येऊन हा शहिदी समागम आयोजित करत आहेत. या सर्व समुदायांचे गुरु साहेबांशी ऐतिहासिक संबंध असून त्यांनी शतकानुशतके एकता, धैर्य आणि मानवतेचा संदेश समाजाला दिला आहे.

हा मेळावा केवळ श्रद्धांजलीपुरता मर्यादित नसून गुरु साहेबांच्या शिकवणी, त्यांचे हौतात्म्य आणि मानवतेचा विचार भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा व्यापक प्रयत्न असल्याचे आयोजकांकडून नमूद करण्यात आले आहे. अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पारोळा तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, पारोळा नगरपरिषदेच्या वतीनेही या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी दिली. पारोळा येथे झालेल्या बैठकीस नगरपरिषदेच्या वतीने कार्यालयीन अधिकारी यामिनी जटे, चंद्रकांत महाजन, तुकडू नरवाडे, बंजारा समाजाचे कांतीलाल नाईक, शालिग्राम पवार, अंकुश पवार तसेच सिंधी समाजाचे मुखी सुरेशसेठ हिंदुजा, अशोककुमार लालवाणी, खेमचंद हिंदुजा, मनोहर हिंदुजा, शंकर हिंदुजा, महेश हिंदुजा, धर्मेंद्र हिंदुजा, किशोर नंदवाणी, जितेंद्र हिंदुजा, सुनील वालेचा यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound