जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इच्छादेवी चौक ते अजिंठा चौफुली दरम्याच्या भारत पेट्रोलपंपासमोर वळण घेण्यासाठी थांबलेल्या दोन कारला भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे दोन्ही कारचे नुकसान झाले. हा अपघात शुक्रवार, ३ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता झाला. या प्रकरणी शनिवार, ४ मे रोजी रात्री १० वाजता ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील प्रभात कॉलनीत राहणारे डॉ. सुधीर वासूदेव नारखेडे हे कार क्रमांक ( एमएच १९, सीएफ ५७४४) मेहरुणकडे जात असताना वळणावर त्यांच्यापुढे एक कार उभी होती. त्यामुळे डॉ. नारखेडे हे देखील त्यामागे थांबले. त्यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एमएच १९, झेड ३८५१) कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे ही कार समोरील कार क्रमांक ( एमएच १९, सीव्ही ९१४६)वर धडकली. त्यात दोन्ही कारचे नुकसान झाले. सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. या प्रकरणी डॉ. नारखेडे यांनी शनिवार, ४ मे रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत.