जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । घरासमोर अंगणात उभ्या केलेल्या एका ईलेक्ट्रीक दुचाकीसह दोन दुचाकींना आग लागून त्या जळून खाक झाल्या. ही घटना जळगाव तालुक्यातील म्हसावद गावात ५ मे रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे हालवाई व्यवसाय असलेले योगेश रमेशचंद अग्रवाल (४९) यांनी त्यांची इलेक्ट्रीक बाईक (क्र. एमएच १९, डीझेड, ३६४६) व दुसरी दुचाकी (क्र. एमएच १९, डीयू ९८३४) अंगणात उभी केलेली होती. त्या वेळी रात्री अचानक आग लागून दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या.
मध्यरात्री दोन वाजता एका जणाने अग्रवाल यांना आवाज देऊन दुचाकी जळत असल्याची माहिती दिली. त्या वेळी त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता दोन्हीही दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. या आगीमुळे अंगणातील झाडही जळाले असून प्रवेशद्वाराजवळ लावलेले शोभेचे विजेचे दिवेही जळाले. आग नेमकी कशामुळे लागली याविषयी काहाही समजू शकले नाही. तसेच सर्वांशी चांगले संबंध असल्याने कोणी आग लावणारही नाही, असे अग्रवाल यांनी सांगितले.