जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरून मधील जे.के. पार्क येथे हातात गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोन जणांना एमआयडीसी पोलिसांनी गुरुवार २९ फेब्रुवारी रोजी रात्री कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि दुचाकी हस्तगत केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन रशीद सय्यद उर्फ खेकडा वय-२१, रा. सुप्रीम कॉलनी आणि दीपक लक्ष्मण तरटे वय-२६, रा.रामेश्वर कॉलनी असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मेहरूण बगीच्या मधील जे.के. पार्क जवळ दुचाकीवर दोन जण हातात गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथकाने गुरुवार २९ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता कारवाई करत संशयित आरोपी दीपक तरटे आणि अमन रशीद सय्यद उर्फ खेकडा याला अटक केली. दोघांकडून गावठी बनावटीचे दोन पिस्तूल आणि दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीयु ४५६५) असा एकूण १ लाख २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दीपक लक्ष्मण तरटे आणि अमन रसित सय्यद उर्फ खेकडा या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अटकेतील अमन रशीद सय्यद उर्फ खेकडा हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी वेगवेगळे स्वरूपाचे १८ गुन्हे दाखल आहे तर दीपक तरटे यांच्यावर वेगवेगळे ४ गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन मुंडे, गणेश शिरसाडे, रामकृष्ण पाटील, पोलीस नाईक किशोर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर सावळे, किरण पाटील, छगन तायडे, ललित नारखेडे, राहुल रगडे यांनी केली आहे.