जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कंडारी गावातील तरूणाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्यानंतर खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी दोन संशयित आरोपींना सोमवारी १० जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अटक केली आहे. दोघांनी खूनाची कबुली दिली असून दोघांना नाशिराबाद पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जळगाव तालुक्यातील कंडारी गावात राहुल उर्फ गोलु युवराज भिल (वय २४) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. २ जुलै रोजी गावातून सकाळी १० वाजता घरून गेला होता. रात्री उशीरापर्यंत घरी आला नाही म्हणून त्याचे वडील युवराज भिल यांनी नशिराबाद पोलीसात ६ जुलै रोजी हरविल्याची नोंद करण्यात आली होती. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता राहुलचा मृतदेह संशयास्पदरित्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघुर नदीच्या पाटचारीत आढळून आला होता. दरम्यान, राहूलचा खून कोणतरी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविली. दरम्यान २ जुलै रोजी मयत राहुल उर्फ गोलु हा गावातील राहणारा जयराम धोंडु कोळी व बादल परदेशी यांचे बरोबर दिवसभर दारु पित असल्याबाबतची माहिती मिळाली. जयराम धोंडु कोळी याचा राहुल उर्फ गोलू याच्याशी वाद झाला होता. सदर ठिकाणी जयराम धोंडु कोळी याचा मित्र होमगार्ड असलेला भूषण उर्फ भुरा पाटील रा. वराडसिम ता. भुसावळ जि. जळगाव हा देखील आल्याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानुसार सोमवारी १० जुलै रोजी दुपारी दोघांना अटक केली. सदर बाबतीत मयत राहुल उर्फ गोलू याचे वडील युवराज दलपत भिल रा. कंडारी ता. जळगाव यांनी दिलेल्या फिर्याद वरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला दोघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा हा पुढिल तपास कामी नशिराबाद पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आलेला आहे.
असा आहे घटनाक्रम
भूषण पाटील याची अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करुन चौकशीत घटनाक्रम सांगितला. रविवार २ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कंडारी गावातुन मयत राहुल उर्फ गोलू याला दुचाकीवर मध्यभागी बसवून घेवून गेलो. दुचाकी जयराम चालवत होता व भूषण मागे बसला होता. संशयित जयराम व भूषण याने त्याला संध्याकाळी जयराम याच्याशी भांडण केल्याच्या कारणावरून रागाच्या भरात मारहाण केली होती व त्यामध्ये तो जागेवर मेला होता. त्यावेळी त्याची ओळख पटु नये म्हणून त्याचे मृतदेह वाघूर नदीच्या पाटचीराच्या खाली असलेल्या पाईपामध्ये लपवून दिला. त्यानंतर पाईपाला दोन्ही बाजूने दगड लावुन दिले होते. तसेच जयराम याने राहुल याचे अंगावरील कपडे काढून कुठेतरी फेकुन दिले होते.
यांनी केली कारवाई
उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख, पोलीस उपनिरीक्षक रविद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सचिन मुंढे, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, ईमान सैय्यद, सुधार गिरासे, सुधीर साळवे, गोविंदा पाटील, मुदस्सर काझी, सचिन पाटील, साईनाथ मुंढे, पोलीस चालक ईम्तियाज खान, चालक मनोज पाटील, जगदिश भोई अशांनी केले आहे. गुन्ह्यातील जयराम धोंडु कोळी हा नशिराबादला दाखल असलेल्या दुस-या गुन्ह्यात यापुर्वी अटक आहे. भुषण याला नशिराबाद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.