Home क्राईम पाचोऱ्यातील ऑइल मिलमध्ये दरोडा टाकणाऱ्या दोन जणांना अटक; ४.१८ लाख रूपयांचा मुद्देमाल...

पाचोऱ्यातील ऑइल मिलमध्ये दरोडा टाकणाऱ्या दोन जणांना अटक; ४.१८ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त

0
104

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा शहरातील मोंढाळा रोड वरील असणाऱ्या ऑइल मिलमध्ये सुरक्षारक्षकाला बांधून ठेवत चाकूचा धाक दाखवून जबरी दरोडा टाकणाऱ्या दोन दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही पाचोरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केली असून पोलीस अधीक्षकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

आशिष जगदीश बाजोरिया (वय ४८, रा. हिंद ऑइल मिल, देशमुखवाडी, पाचोरा) यांनी दि. २३ जुलै २०२३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास फिर्याद दिली होती. त्यानुसार दि. २३ जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मोंढाळा रोडवरील बाजोरिया ऑइल रिफायनरी या ऑइल मिलमध्ये दरोडा पडला होता. सुरक्षारक्षक प्रभाकर रामदास पाटील (वय ६१, रा. सारोळा ता. पाचोरा) यांना अज्ञात चोरट्यांनी हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवला होता.

त्यानंतर ४ लाख ५ हजार रुपयांची रोकड, ५ हजार रुपये किमतीची गोदरेज कंपनीची तिजोरी, डीव्हीआर मशीन, मोबाईल आदी ४ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये पाचोरा पोलीस स्टेशन तपास करीत होते. पोहेकॉ राहुल शिंपी, योगेश पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून माहिती काढली. संशयित आरोपी हे फिर्यादीचे घरी आले आहेत अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी कसून तपास करत संशयित आरोपी अल्ताफ मसुद खान (वय ३१, रा. नुराणी नगर, जारगाव, ता. पाचोरा) व सरफराज हसन शहा फकीर (वय २२ रा. मुल्लावाडा,पाचोरा) यांना अटक केली आहे. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून गुन्ह्यात त्यांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.

त्यांच्या साथीदार मुक्तार उर्फ धड्या मेहबूब शेख (रा. नुरानी नगर, जारगाव ता. पाचोरा) हा फरार आहे. सदर संशयित आरोपींकडून पिस्टल सारखे दिसणारे लायटर, ५० हजार रुपये रोख आणि चाकू हा जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल शिंदे, योगेश पाटील आदींनी पार पाडली आहे.


Protected Content

Play sound