ट्विटर करणार राजकीय जाहिरातीस मज्जाव

twitter

मुंबई वृत्तसंस्था । मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरकडून मोठा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. आता राजकीय जाहिराती ट्विटर वरून प्रदर्शित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार, सरकार, संस्था, नेते यांच्या जाहिराती या आठवड्यापासून स्वीकारल्या जाणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ट्विटरचे सीईओ जॅक डार्सी यांनी राजकीय जाहिराती स्वीकारणार नसल्याची माहिती ट्वीटवरून दिली आहे.

इंटरनेटवरील जाहिराती या यूजर्सवर जास्त प्रभाव टाकतात. या राजकीय जाहिरातींचा मतदानावर परिणाम होतो. त्यामुळे आम्ही जाहिराती घेण्याचे बंद केल्याचे कंपनीने सांगितले आहे. कोणत्याही प्रकारच्या राजकीय मजकूराची जाहिरातबाजी करण्याच्या संकल्पनेचं ट्विटर खंडन करत आहे. कोणत्याही प्रकारचा राजकीय संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ट्विटर हे माध्यम नाही. राजकीय संदेश हा लोकांपर्यंत पोहचला पाहिजे तो विकला जाऊ नये, यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही राजकीय जाहिराती ट्विटर स्वीकारणार नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करणं हे व्यावसायिक जाहिरातदारांसाठी अतिशय परिणामकारक असले तरी यामुळे राजकारणासाठी याचे मोठे धोके निर्माण होतात असे ट्विट सीईओ जॅक डॉर्सी यांनी 31 ऑक्टोबर रोजी केले होते. ट्विटरच्या या निर्णयामुळे आता फेसबुक या सोशल मीडिया साइटवर देखील दबाव वाढला आहे.

 

Protected Content