मुंबई (वृत्तसंस्था) बालभारतीच्या इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकात 21 ते 99 हे आकडे आता यापुढे जोडाक्षराप्रमाणे नाही, तर संख्यावाचनाप्रमाणे शिक्षकांनी शिकवायचे आहेत. म्हणजेच 32 या आकड्याचा थेट बत्तीस असा उल्लेख न करता ‘तीस दोन’ असा उल्लेख करावा लागेल. यावरुन लोकभारतीचे आमदार कपिल पाटील हे चांगलेच संतापले असून बालभारतीची नवी पुस्तकं फेकून द्या, अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे.
बालभारतीने दुसरीच्या गणित पुस्तकात मोठा बदल केला आहे. दुसरीच्या गणित पुस्तकातील संख्या वाचन करताना एकवीस ऐवजी वीस एक, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णव ऐवजी नव्वद तीन असे वाचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मराठी जोडाक्षरे कठीण असल्याचा हवाला देत बालभारतीने या नव्या पद्धतीची अंमलबजावणी केली आहे. पुस्तकात नवी व जुनी पद्धत अशा दोन्ही स्वरुपात मांडणी देण्यात आली आहे. मात्र ही देत असताना शिक्षकांनी नवीन पद्धतीने शिकवावे, अशा सूचनाही शिक्षण मंडळाने केल्या आहेत. जोडाक्षरामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम होत असून गणिताची नावड निर्माण होत असल्याचे बालभारतीचे म्हणणे आहे. शिवाय इंग्रजीसोबतच कानडी, तेलगू, तामिळ भाषांमध्येही अशाच प्रमाणे शिक्षण होत असल्याचे बालभारतीने सांगितले आहे.
दरम्यान, शिक्षणामध्ये आतापर्यंत जे जे विनोद झाले आहेत, जे काही झाले आहे ते आता नव्या शिक्षण मंत्र्यापुढे वाढून ठेवले आहे, असा टोला शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी लगावला. संख्यावाचनाची ही नवी पद्धत चुकीची आहे. मराठी भाषा मारायला हे निघाले आहेत. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असताना हे काहीतरी वेगळे सुरु असल्याचे ते म्हणाले. कितीही खर्च झाला तरी मराठीची पुस्तकं बदलली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.