वॉशिंगटन, वृत्तसंस्था | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरप्रकरणी केलेल्या वक्तव्यावरून गेल्या दोन दिवसांत बरीच खळबळ उडाली आहे. त्यांच्या विधानावर अमेरिकन सरकारला स्पष्टीकरणही द्यावे लागले आहे. पण ट्रम्प यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. ‘वॉशिंगटन पोस्ट’ने दिलेल्या एका अहवालानुसार, सत्तेत आल्यापासून जून २०१९पर्यंत ट्रम्प यांनी असे तब्बल १०,७९६ भ्रामक, खोटे आणि वादग्रस्त दावे केले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेत येण्याआधीपासूनच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध होते. पण सत्तेत आल्यानंतरही ट्रम्प यांनी वादग्रस्त विधाने करणे सुरूच ठेवले आहे. ‘वॉशिंगटन पोस्ट’ च्या फॅक्ट चेक विभागाने केलेल्या पाहणीनुसार, ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासून दररोज सरासरी १२ वादग्रस्त विधाने केली आहेत. यातील अनेक विधाने निराधार, भ्रामक आणि खोटी होती. ट्रम्प यांच्या विधानाशी सरकारच्या भूमिकेचा काहिही संबंध नसल्याची स्पष्टीकरणेही अमेरिकन सरकारने वारंवार दिली आहेत.
मे-जून २०१९ मध्ये तर ट्रम्प यांनी दररोज १६ अशी वक्तव्ये केली आहेत. ट्रम्प यांनी सर्वाधिक वादग्रस्त विधाने मेक्सिकोतून अमेरिकेत होणाऱ्या स्थलांतरांवर केली आहेत. त्यानंतर अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणाबद्दलही सर्वाधिक फसवे दावे केले आहेत. हे दावे ट्रम्प यांनी फक्त ट्विटरच्या माध्यमातूनच केले आहेत असे नाही, तर पत्रकार परिषदा आणि विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्येही त्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. तसेच परराष्ट्र धोरण, इस्रायल-पॅलेस्टाइन वाद, कृषी उद्योग यावरही ट्रम्प बोलले आहेत. ‘वॉशिंगटन पोस्ट’नेही पुराव्यांसह ट्रम्प यांचे अनेक दावे खोडून काढले आहेत.