मुंबई: टीआरपी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलने वृत्तवाहिन्यांच्या टीआरपी मूल्यमापनावर तीन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच टीआरपी घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. जाहिरातीच्यादृष्टीने जास्तीत जास्त टीआरपी पदरात पाडून घेण्यासाठी वाहिन्यांकडून सुरु असलेला हा गैरप्रकार समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.
या सगळ्या प्रकारानंतर बीएआरसीच्या संचालक मंडळाकडून भविष्यात असे गैरप्रकार टाळण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून टीआरपी मूल्यमापनाची सध्याची पद्धत आणि यंत्रणेतील दोष दूर करण्यासाठी काय करता येईल, याचा आढावा घेतला जाईल. त्यासाठीच बीएआरसी कडून तीन महिने टीआरपीचे आकडे जाहीर न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे न्यूज ब्रॉडकास्टिंग असोसिएशनकडून स्वागत करण्यात आले आहे.
बीएआरसी या संस्थेकडून टीआरपी मोजला जातो. यासाठी देशभरात जवळपास 30 हजार बॅरोमीटर्स लावण्यात आले आहेत. यापैकी दोन हजार बॅरोमीटर्स हे एकट्या मुंबईत आहेत. हे बॅरोमीटर्स कुठे लावलेत, याची माहिती गोपनीय असायची. हंसा या कंपनीला या बॅरोमीटर्सची देखभाल करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून टीआरपीमध्ये फेरफार करण्याचे रॅकेट चालवण्यात येत होते.