सेरमपूर, (प.बंगाल) (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालमधील सेरमपूर येथील सभेत पंतप्रधान मोदींनी तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट केला आहे. तृणमूलचे अनेक आमदार लोकसभा निवडणुकीनंतर पक्ष सोडणार आहेत, असा दावाही पंतप्रधानांनी केला आहे. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याने बंगालमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बंगालच्या जनतेचा ममतादीदींनी विश्वासघात केला आहे. या देशाची जनता चूक माफ करेल, पण विश्वासघात खपवून घेणार नाही. ममतादीदी तुमच्या पायाखालची जमीन सरकली आहे. २३ मे रोजी निकाल लागल्यावर सर्वत्र कमळ फुललेले दिसेल. यानंतर तुमचे आमदारही तुम्हाला सोडून जातील. आताही तुमचे ४० आमदार आमच्या संपर्कात आहेत. ममतादीदी तुम्ही जनतेचा विश्वासघात केलाय. आता तुम्ही वाचू शकणार नाही, असेही मोदी यावेळी म्हणाले.
पश्चिम बंगालची माती आणि दगडांनी बनलेला रसगुल्ला मला खाऊ घालण्याची दीदींची इच्छा आहे. हे माझे सौभाग्यच आहे. या मातीत रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, चैतन्य महाप्रभु, जगदीशचंद्र बसू, नेताजी सुभाषचंद्र बोस, श्यामाप्रसाद मुखर्जी असे महापुरुष जन्मले. अशा अनेक महापुरुषांच्या चरणांनी पावन झालेल्या बंगालच्या मातीचा रसगुल्ला मिळेल तर तो माझ्यासाठी प्रसादच असेल. ही माती माझ्यासाठी प्रेरणा आहे, मी बंगालच्या मातीच्या रसगुल्ल्याची वाट पाहतोय, असा टोलाही मोदींनी ममता बॅनर्जींना लगावला आहे.