डोंगरकठोरा येथे आदिवासी बांधवांचा भोंगर्‍या बाजार उत्साहात ( व्हिडीओ )

Dongar kathora

यावल प्रतिनिधी । डोंगरकठोरा येथे आदिवासी बांधवांची जीवन संस्कृती दर्शविणारा होळीच्या आधी भरणारा भव्य भोंगर्‍या बाजार मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यासाठी शेकडोंच्या संख्येने आदिवासी बांधव महाराष्ट्र व मध्यप्रदेश मधून विविध पाड्यातील आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला.शेकडो वर्षापासून आदिवासी बांधव होळीच्या आधी भरणाऱ्या भोंगर्‍या बाजाराची ही परंपरा चालत आली आहे. विविध पाड्यातील आदिवासी बांधवांनी यावेळी डोक्याला फेटा, डोळ्यावर चष्मा, कमरेला मोठे ढोल, रंगीबेरंगी सजवलेल्या काठ्या, मोरपिसांची बासरी, ढोल व शस्त्र अशा पारंपरिक साहित्याचा व पोशाखाचा वापर आदिवासी बांधवांनी केला होता. यावेळी आदिवासी बांधवा मध्ये मोठे चैतन्य पाहावयास मिळाले.

डोंगरकठोरा येथे हा भोंगर्‍या बाजार पहिल्यांदाच होत असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये वर्षभर काबाडकष्ट करणारे आदिवासी स्त्री पुरुष, तरुण-तरुणी असे सर्व बेभान होऊन पारंपरिक तालावर नाचून गाणे ही म्हणत होते. या भोंगऱ्या बाजारामध्ये अनेक तरुण-तरुणींचा सहभाग असतो व यावेळी काहींचे लग्नही जमतात अशी प्रथा आहे. हा आनंदोत्सव होळी तसेच पंचमी पर्यंत चालतो. या भोंगर्‍या बाजारात आदिवासी एकता मंचतर्फे मान्यवरांच्याहस्ते ज्यांचा ढोल चांगला वाजेल अशांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी सरपंच सुमनबाई वाघ, उपसरपंच नितीन भिरुड, ग्रा.पं.सदस्य चंदू भिरुड, रत्नदीप सोनवणे, निसार तडवी, यदुनाथ पाटील, पोलीस पाटील राजरत्न आढाळे, आदिवासी एकता मंच जिल्हा सहसंघटक रब्बिल तडवी, प्रसिद्धी प्रमुख मनीष तडवी, गणेश वाघ,सुपडु तडवी, छब्बीर तडवी, हमीद तडवी, रियाज तडवी, जिरभान पावरा, अमिरा पावरा, गुरुजी पावरा, डोंगरसिंग भिलाला, नरसींग भिलाला, रामा भिलाला तसेच आदिवासी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पहा । भोंगऱ्या बाजारात विविध पाड्यातील आदिवासी बांधवांनी सहभाग

 

Add Comment

Protected Content