चार राज्यांमध्ये लसीकरणाची रंगीत तालीम

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पुढील महिन्यात बहुतांश राज्यांमध्ये कोरोनाचे लसीकरण होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता चार राज्यांमध्ये याची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे.

केंद्रासह विविध राज्य सरकारांनी लसीकरणाची जय्यत तयारी केल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने येत्या २८ व २९ डिसेंबरला पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश, गुजरात या चार राज्यांमध्ये केंद्र सरकारकडून लसीकरणाची रंगीत तालीम केली जाणार आहे. यात को-विन अ‍ॅपमध्ये लस घेणार्‍याचे नाव नोंदवले जाईल. त्या संबंधित व्यक्तीला या अ‍ॅपच्या माध्यमातून लस टोचून घेण्याची वेळ, ठिकाण, दिवस कळविला जाईल. लस टोचण्यासाठी प्रत्येक केंद्रामध्ये विशिष्ट संख्येने कर्मचारी या रंगीत तालमीत सहभागी होणार आहेत.

लस टोचलेल्यांना अर्धा तास एका खोलीत निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे. तसेच संबंधित व्यक्तीच्या प्रकृतीवर काही विपरीत परिणाम होत नाही ना, याकडे डॉक्टर लक्ष देतील. दिवसभरात किती लोकांना एका केंद्रामध्ये लस टोचण्यात आली, याची नोंदही को-विन अ‍ॅपच्या माध्यमातून ठेवली जाईल. लसीकरणाची रंगीत तालीम प्रत्येक राज्याच्या दोन जिल्ह्यांत पार पडणार आहे.

Protected Content